Mission-2024: माजी महापौर संजोग वाघेरेंच्या हाती ‘मशाल’ अन् पायाला भिंगरी!
गाव भेट दौऱ्याचा झंझावात : मतदार संघामध्ये प्रचंड जनसंपर्क अन् भेटीगाठी
![Mission-2024: 'Torch' in the hands of Sanjog Waghere and Bhingri on his feet!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjog-waghere-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि ‘मशाल’ हाती घेतली. त्यानंतर संपूर्ण मतदार संघात गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने पायाला भिंगरी बांधली असून, प्रचंड जनसंपर्काचा झंझावात सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासाने संजोग वाघेरे यांच्याकडे ‘‘मावळ लोकसभा संघटक’’ पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वाघरे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित मानली जाते.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले असून, मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू झाले आहे. शहर शिवसेनेनेही (उबाठा) गाव भेट दौरा आयोजित करून शहरातील विविध भागांतील नागरिकांशी संवाद साधला आहे. परिसरातील समस्या, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न याबाबतचा आढावा शिवसेना नेत्यांनी घेतला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांचा गाव भेट दौरा झाला. या दौऱ्यात संजोग वाघेरे यांनी बोपखेलमधील सर्व नागरिकांशी संवाद साधला. बोपखेलमध्ये भेडसावणारे प्रश्न जाणून घेतले. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना अपेक्षित असणाऱ्या विकासाबाबत चर्चा केली. शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
पुलाच्या कामाबाबत वाघेरेंना विनंती…
बोपखेल येथील सैन्य दलाच्या हद्दीतील पुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या पुलाबाबत आश्वासने दिली आहेत. मात्र, अद्यापही या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे संजोग वाघेरे यांच्याकडे बोपखेल येथील नागरिकांनी पुलाचे काम पूर्ण करून घेण्यासाठी विनंती केली. त्यावर, महापालिका आयुक्त तसेच शासनाकडे या बाबत पाठपुरावा सुरू असल्याचे वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, काही वर्षांपूर्वी बोपखेलच्या नागरिकांनी पुलासाठी आंदोलन केले होते. त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.