डीपी रस्त्यातील अनधिकृत बांधकामे हटविणार- महापौर राहूल जाधव
पिंपरी – शहरातील प्रमुख रस्त्यांमुळेच पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे. आता अंतर्गत डीपी रस्ते विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी आरक्षित जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. डीपी रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय महापौर राहूल जाधव यांनी घेतला आहे. तशा सूचनाही त्यांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिल्या आहेत. काही दिवसांत डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहरातील 12, 18, 24, 30, 45, 90 मीटर रस्त्याच्या जागा आरक्षीत आहेत. मात्र, यातील अनेक रस्त्यांच्या जागा पालिकेच्या ताब्यात नाहीत. काही प्रमुख रस्त्यांचा ताबा मिळवून ते रस्ते विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने झाला आहे. याहूनही अधिक विकास साधण्यासाठी शहरातील अंतर्गत डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहे. आणखी किती डीपी रस्ते विकसित झाले नाहीत, याची माहिती नगररचना विभागाकडून मागविली आहे. माहिती हाती घेताच कारवाईचा आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर डीपी रस्त्याच्या जागेतील अनधिकृत बांधकामे हटविण्याचा निर्णय घेतला जाईल. शहरातील सर्व प्रलंबीत डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहेत, असेही महापौर जाधव यांनी सांगितले.
प्रलंबित डीपी रस्त्याची जागा ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण केलेल्या नागरिकांना पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. पंधरा दिवसांत जागा रिकामी न केल्यास पालिका थेट कारवाई करणार आहे. राजकीय लोकप्रतिनिधींची बांधकामे रस्त्यात आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. यात राजकीय हस्तक्षेप चालू देणार नाही.
महापौर राहूल जाधव, पिंपरी-चिंचवड मनपा