पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
नवभारत समुहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष महेश्वरी यांच्या हस्ते पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी स्वीकारला प्रतिष्ठेचा पुरस्कार
![Another honor in the wake of Pimpri Chinchwad University of PCET](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/pccet-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवडः शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना तसेच सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणारा ‘नवभारत के शिल्पकार’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, नवभारत समुहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष महेश्वरी यांच्या हस्ते पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी स्वीकारला. त्यामुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मुंबईतील ताज विवांता येथे शनिवारी (13) आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी आदी उपस्थित होते.
‘नवभारत के शिल्पकार’ हा पुरस्कार ज्या संस्थांनी आपल्या देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रतिभेचे संगोपन करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमात सहभाग, संशोधनाला चालना देणे, नवोपक्रमाला चालना देणे, विकसित भारताच्या उभारणीसाठी दीर्घकालीन योजना आखणे आणि भविष्यातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे यासाठी हा पुरस्कार दिला जातो.