मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या दोन तासांचा ब्लॉक
![A two-hour block tomorrow on the Mumbai-Pune Expressway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Mumbai-Pune-Expressway-780x470.jpg)
पुणे | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी ९.८०० (पनवेल एक्झिट) आणि कि.मी २९.४०० ( खालापूर टोल प्लाझा व मडप बोगद्यादरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ११ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.३० वा ते दुपारी ३.३० या वेळेत करण्यात येणार आहे.
या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलकी तसेच जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस ही खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्ग वरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.
हेही वाचा – एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
तसेच पुण्याहुन मुंबईकडे जाणारी हलकी व जड अवजड वाहने ही खालापूर टोल नाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर एक्झिट येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.