बीडमधून मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये निर्णायक इशारा सभा पार पडली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केली. मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार, असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.
हेही वाचा – Malaria Vaccine : मलेरियावरील भारतीय लसीचा WHOच्या यादीत समावेश
शांततेच्या आणि कायदेशीर मार्गानं आपण उपोषण करू. पण, कोण कुठं बसेल माहिती नाही. रोड मोकळी करून बसण्याची व्यवस्था करावी. नाहीतर आमच्या धोरणाने आम्ही बसू. मात्र, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरू. फक्त शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे चला. शांततेची धूळ जरी उडाली, तरी सरकार मुंबईत राहणार नाही. सगळे आपल्या गावी येणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. अंतरवाली हून मराठ्यांचा जनसागर मुबंईला जायचं आहे. मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, कोणी गाडी पेटवायला लागला तर त्याला जाग्यावर पकडून पोलिसांकडे द्यायचं, आपला असेल तरी त्याला पकडून पोलिसांकडे द्या. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री यांना विनंती आहे. मराठा समाजाच्या लेकरांच्या पाठीशी उभे रहा. जर पाठीशी उभे नाही राहिलात तर मराठ्यांचे घर तुम्हाला कायम स्वरूपी बंद राहिल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.