Say No To Garbage Depot: पुनावळेत उद्या नागरिकांचे चिपको आंदोलन!
प्रस्तावित कचरा डेपो विरोधात बाईक रॅलीचेही आयोजन
![Say No To Garbage Depot: Citizens' Chipko Movement in Punavle tomorrow!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Chipko-Andolan-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पुनावळे कचरा डेपोसाठी वनविभागाच्या जागेतील वृक्षतोडी विरोधात झाडांना आलिंगन देऊन चिपको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच कचरा डेपोला विरोध करण्यासाठी उद्या रविवारी (दि. 5) सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत पुनावळे परिसरात नागरिकांकडून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुनावळे येथे वनविभागाची 26 हेक्टर जागा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मागणी केल्यामुळे ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. पुनावळे परिसरात नागरीकरण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये उभारली आहेत. पुनावळेतील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पापासुन विविध इमारती, गृहनिर्माण सोसायटी खूप कमी अंतरावर आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
उद्या रविवारी (दि. 5) पुनावळे येथील लेटीट्यूड मॉलपासून दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅली झाल्यानंतर पुनावळे काटे वस्ती येथील वन विभागाच्या जागेतील झाडांना आलिंगन देऊन चिपको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पुनावळे, ताथवडे, मारुंजी, जांबे, हिंजवडी, लाइफ रिपब्लिक टाऊनशिप, वाकड या परिसरातील नागरिक सहभागी होणार आहेत.