‘अपात्रतेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत’; कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं विधान
![Asim Sarode said that Eknath Shinde will not be the Chief Minister after his disqualification](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Asim-Sarode-and-eknath-shinde-780x470.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यानंतर त्यांना विधान परिषदेतून निवडून आणलं जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे.
असीम सरोदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे वकिली शिक्षण घेतलेले व्यक्ती आहेत. अत्यंत निष्णात संविधानतज्ज्ञ श्रीहरी अणे यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी वकील म्हणून काही काळ काम केले आहे. तरीही आज ते असंवैधानिक गोष्टी करण्यात नेहमी पुढाकार घेताना दिसतात. देवेंद्र फडणवीस आता म्हणतायत की, एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तरीही त्यांना विधानपरिषदेत आमदार म्हणून घेऊ व तेच मुख्यमंत्री पदावर राहतील. त्यांनी मनात आणले तर ही पुढची घटनाबाह्यता ते आणू शकतात.
हेही वाचा – ब्राह्मण असल्याचा अचानक न्यूनगंड का वाटावा? ठाकरे गटाचा फडणवीसांना सवाल
पण हे सांगायला पाहिजे की संविधानाच्या कलम १०२/२ व १९१/२ मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, जर संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाहीतच शिवाय ते विधानपरिषदेचे सदस्यही बनू शकणार नाहीत. वकिलांनी आणि वकिली व्यावसायातील लोकांनी आपल्याला पाहिजे तसाच कायदा सांगावा, न्यायव्यस्थेतील लोकांनी यांना पाहिजे तसेच कायद्याचे अर्थ काढावे, हा दबाव आणण्यात याच प्रवृत्तीने गढूळपणा आणला आहे, असंही असीम सरोदे म्हणाले.