सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले..
![Amol Mitkari said that a brother like Ajit Pawar stands firmly behind him](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/supriya-sule-and-ajit-pawar-780x470.jpg)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो, असं सूचक वक्तव्यही सुप्रिया सुळे यांनी केलं. दरम्यान, यावरून अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.
अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो. खरंच प्रत्येक बहिण इतकी भाग्यवान नसते की, तिचं रक्षण करणारा भाऊ प्रत्येक घरात असावा. मात्र, याबाबत सुप्रिया सुळे अपवाद आहेत. कारण अजित पवारांसारखा एक भाऊ त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.
शरद पवारांनंतर अजित पवरांनीच सुप्रिया सुळेना बारामती लोकसभा मतदारसंघात जे आशीर्वाद दिले, ज्या पद्धतीने अजित पवार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी उभे राहिले त्याबद्दल त्या खरंच भाग्यवान आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
हेही वाचा – पिंपळे सौदागरमध्ये वीजेच्या धक्क्याने ३ शेळ्यांचा मृत्यू
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचं कल्याण व्हावं असं वाटतं. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं. महिला वर्गासाठी पुरुषही तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक पुरुषांनी महिला वर्गाला सक्षम केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्यांच्यामुळेच आज माझ्यासारखी महिला इथे उभी आहे. भारतात सर्वात आधी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण राबवलं. माझे वडील शरद पवार यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केलं होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.