विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याप्रकरणी चौघांना दहा हजारांचा दंड

पिंपरी :- वाहतुकीचे नियम मोडून विरुद्ध दिशेने वाहन चालविल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाच दिवशी चार वाहन चालकांविरोधात कारवाई केली. सर्व वाहन चालकांना शिवाजी नगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा हजारांचा दंड ठोठावला. वाहन चालकांनी दंड न भरल्यास त्यांना एक दिवसाचा कारावास होणार आहे.
संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी होणा-या चौकांमध्ये एकेरी वाहतूक, काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांविरोधात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येत आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. 17) चार जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम 279 नुसार कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांना आज शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडी पासून सुरुवात केली. 3 सप्टेंबर रोजी हिंजवडी मधील सर्वात जास्त वाहतुकी कोंडी होणा-या शिवाजी चौकात एकेरी वाहतूक सुरु केली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या या बदलाचे सकारात्मक परिणाम दिसताच त्याबाबत अंतिम आदेश काढून एकेरी चक्राकार वाहतूक करण्यात आली.
दरम्यान 1 ते 17 सप्टेंबर पर्यंत हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतुकीचे नियम मोडणा-या २८ वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने प्रत्येकाला आर्थिक दंड भरण्यास सांगितले. तसेच जे वाहन चालक आर्थिक दंड भरणार नाहीत, त्यांना एक दिवसाच्या कारावासाची देखील शिक्षा देण्यात आली.





