राजकीय संभ्रम दूर : माजी आमदार विलास लांडे अजित पवारांसोबत; महापालिकेतील बैठकीला उपस्थिती!
कार्यकर्ता मेळावा: राज्यातील सत्तेतील सहभागानंतर पहिल्यांनाच अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये!
![Political confusion removed: Former MLA Vilas Lande with Ajit Pawar; Attendance at the municipal meeting!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Ajit-Pawar-1-1-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादीचा मोठा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहीला आहे. माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात होती. मात्र, आज झालेल्या महापालिकेतील बैठकीला लांडे उपस्थित राहिल्यामुळे ‘‘लांडे अजितदादांसोबतच’’ यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आढावा बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक मयूर कलाटे, प्रशांत शितोळे तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत.
राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह अजित पवार यांनी भाजपा+शिवसेना महायुतीसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शहरातील दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर माजी आमदार विलास लांडे कोणत्या गटात जाणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा पवार पहिल्यांदाच शहरात आले आहेत. शहरात आज सकाळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर महापालिकेत त्यांनी प्रशासकीय आढावा बैठक सुरू केली आहे. शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प तसेच नवीन कामांचा ते आढावा घेणार आहेत.
त्यानंतर चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तेथे अजितदादा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजितदादा उद्या पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.