‘सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार’; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
![Vijay Wadettiwar said that the chief chair of the state will be changed in the month of September itself](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Eknath-Shinde-and-Vijay-Wadettiwar-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवलं जाणार अशी चर्चाही वारंवार होत आहे. विरोधी पक्षातील नेते याबाबत सातत्याने दावे करत आहेत. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं मी म्हणत नाही. पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल. हे ठासून सांगतो.
राज्यातील राजकीय वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारत आहेत. तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले की मुख्यमंत्री येत नाहीत. हे सर्व राज्यात चाललं आहे. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा – आमदार अपात्रतेचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले..
तिन्ही पक्षाच्या महत्त्वकांक्षा आहे. प्रत्येकजण जेवढा हात मारता येईल तेवढा हात मारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची त्यांना पर्वा नाहीये. राज्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सरकार चालवायचं म्हणून चालवलं जात आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवला गेला. यावरून त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्नाटकात जो पुतळा हटवला गेला. तो अनधिकृत पुतळा होता. त्या पुतळ्याचा चेहरा आणि महाराजांचा चेहरा यात फरक होता. अनधिकृतपणे तो पुतळा बसवला होता. भाजपने थोडी तरी माहिती घ्यावी. अरे तोंडात आलं बकून दिलं करू नका. मूर्खा सारखे बोलू नका. कर्नाटकात भाजपचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ ते १२ पुतळे हटवण्यात आले होते. ते अनधिकृत होते. तेव्हा का बोलले नाही?तेव्हा तोंड शिवलं होतं का? असा सवाल उपस्थित केला.