‘शरद पवारांचा फोटो वापरणं हे अजित पवार गटाचं ढोंग’; संजय राऊतांचा टीका
![Sanjay Raut said that using Sharad Pawar's photo is a pretense of Ajit Pawar group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Sanjay-Raut-1-1-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रावादीत उभी फूट पडली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून बॅनर्सवर शरद पवारांच्या फोटोंचा वापर केला जात असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याचप्रमाणे शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा असूनही तुम्ही तो शिदे गटाला दिला. पण शरद पवार हयात आहेत. त्यांच्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष तुम्ही त्यांच्यासमोर दुसऱ्या कुणाला देत आहात. या देशात हे घडतंय. निवडणूक आयोगाचा गैरवापर होतोय. केंद्रीय यंत्रणा, तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. शरद पवारांनी सांगितलं की आता ईडी ठरवणार कोण कुणाच्या पक्षात जाईल. कोण मंत्री बनेल वगैरे. शरद पवारांनी ही फार गंभीर बाब सांगितलीये. सगळा देश त्यामुळे चिंतेत आहे.
शरद पवारांनी काल हे परखड भाष्य केलंय. शरद पवारांनी चिंता व्यक्त केली की जे शिवसेनेच्या बाबतीत फुटीनंतर घडलं, तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हयातीत त्यांचा पक्ष तोडण्यात आला आणि तुटलेल्या पक्षाला मूळ शिवसेना व चिन्ह देण्यात आलं. त्याचप्रमाणे शरद पवार समोर असताना, त्यांनी स्थापन केलेला पक्ष-कार्यकारिणी आहे. तरी शरद पवारांना असं वाटतंय की हे सगळं शिवसेनेप्रमाणे घडून आपला पक्ष फुटीर गटाला दिला जाईल. हे विदारक चित्र आहे. पक्षाचा संस्थापक तिथे असताना त्याचा पक्ष फोडून दुसऱ्याच्या हातात त्याची मालकी दिली जाते. या देशात असं कधी घडलं नव्हतं. म्हणून देशाच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटते, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – भोसरीत तिरंगा बाईक रॅलीने ‘राष्ट्रभक्तीचा जागर’
#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "…Misuse of Election Commission and all Central agencies is happening. NCP Chief Sharad Pawar said that the ED decides who joins which party and it also decides who becomes a minister. This is a very serious statement by… pic.twitter.com/IYP6vARrub
— ANI (@ANI) August 17, 2023
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला जातो, तसाच शरद पवारांचाही फोटो वापरला जातो. तुम्ही माझ्यापासून, माझ्या पक्षातून दूर गेलात म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं मान्य नाही हे बाळासाहेबांचे विचार होते. तरी तेव्हा फुटून बाहेर पडलेल्या लोकांनी बाळासाहेबांचे फोटो वापरायला सुरुवात केली, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना आपला फोटो वापरू नका असं सांगितलं. आज शरद पवारांपासून लोक फुटून गेले. तरी म्हणतात शरद पवार आमचे नेते. हे ढोंग आहे.
तुम्ही तुमचा पक्ष स्थापन करा. तुम्ही तुमचे फोटो लावून मतं मागा. तुम्हाला शरद पवार, बाळासाहेब ठाकरे कशाला पाहिजेत? तुमच्यात तेवढी धमक आणि हिंमत नाही का? स्वत:चे, स्वत:च्या वडिलांचे फोटो का वापरत नाही? शरद पवार आमचे देव आहेत म्हणतात. मग देवाच्या पाठीत खंजीर का खुपसला? बाळासाहेब ठाकरे आमचे देव आहेत म्हणाले, मग त्यांचा पक्ष का फोडला तुम्ही? डरपोक लेकाचे, असंही संजय राऊत म्हणाले.