पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती : अधिवेशनानंतर नवी कार्यकारिणी
![Pimpri-Chinchwad city NCP Youth Congress executive dismissed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Pimpri-Chinchwad-NCP-1-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. सर्व कार्याध्यक्ष, सर्व विधानसभा अध्यक्ष व शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी (उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, चिटणीस व शहर कार्यकारणी सदस्य) सर्व प्रभाग अध्यक्ष व वार्ड अध्यक्ष यांना पदमुक्त करण्यात आले असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. म्हणुन पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान शहर कार्यकारणी आम्ही बरखास्त करत आहोत. आदरणीय शरदचंद पवार यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या वरील पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची नवीन कार्यकारणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या देण्यात येतील, अशी माहिती यावेळेस युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.
हेही वाचा – ..तर संभाजी भिडे यांना फाशी देणार का? नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल
इम्रान शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी सर्व धर्मातील युवकांना संघटनेत स्थान दिले. या दीड वर्षात शंभरावरून अधिक आंदोलने,पक्ष संघटनेचे कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सक्षमपणे राबवले. युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न,शहरातील प्रमुख नागरी समस्या, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध, महापुरुषांच्या बदनामी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने अनेक आंदोलने घेण्यात आली. त्याचप्रमाणे युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील विविध वार्डात आरोग्य शिबीर घेण्यात आले.युवका मार्फत अनेक शालेय विद्यार्थी शैक्षणिक दत्तक घेण्यात आले.
शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात युवक संघटनेने चिंचवड विधानसभा निवडणुकीत देखील ३ मोठे युवक मेळावे,पदयात्रा,अनेक कोपरा सभा, बूथ यावर नियोजित काम केल्याचे आढळून आले आहे. फक्त चिंचवड विधानसभेत २५० युवकांची कार्यकारणी जाहीर करून युवकांनी हम किसी से कम नही हे दाखवून दिले होते.