श्रावणाच्या आधी गटारी का साजरी करतात? नेमकं कारण काय?
![Why is Gattari celebrated before Shravana? What is the real reason?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Gatari-Amavasya-780x470.jpg)
Gatari Amavasya : गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. श्रावण महिनाभर मद्यपान व मांसाहार वर्ज्य केला जातो. पंचांगानुसार मराठी महिन्यात आषाढी अमावस्या हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेक जण मांसाहार आणि मद्यपान करतात. यावेळी गटारी अमावस्या १७ जुलै म्हणजे उद्या आहे. तर परवापासून श्रावण महिन्याची सुरूवात होत आहे.
गटारी अमावस्या म्हणजे काय?
गटारी अमावस्येला गटारी हे नाव मुळ शब्दाच्या अपभ्रंशामुळे पडले आहे. गताहारी हा मुळ शब्द आहे. गत म्हणजे मागे सोडणे आणि हारी म्हणजे आहार. कांदा, लसून आणि इतर तामसिक गोष्टीच्या आहाराला मागे सोडणे असा त्याचा अर्थ होतो. मात्र मुळ शब्दाचा अपभ्रंश होत गताहारीचे गटारी नामकरण झाले. श्रावण महिना हा पावसाचा असतो. या काळात प्राण्यांमध्ये रोगराईचे प्रमाण जास्त असते. तसेच या कालावधीत पचनक्रियासुद्धा मंदावते. त्यामुळे मांसाहार न करण्याचा सल्ला तज्ञ देतात.
हेही वाचा – ‘शिंदे सरकारचं हायकमांड देवेंद्र फडणवीसच’; भाजप आमदाराचं विधान चर्चेत
आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी समस्त नॉनव्हेज प्रेमी मटण, चिकन, नॉनव्हेज खातात. या दिवशी विविध हॉटेलमध्येही नॉनव्हेजप्रेमींची गर्दी असते. त्याचप्रमाणे मद्यपानही केले जाते. यानंतर श्रावण मास सुरू होत असल्यामुळे बहुतांश कुटुंबांमध्ये मांसाहार आणि मद्यपान केले जात नाही. काही कुटुंबांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जनापर्यंत मासांहार केला जात नाही. त्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त होते. रविवारचा दिवस हा कुटुंबातील सदस्यांच्या सुट्टीचा, एकत्र येऊन मजा करण्याचा हक्काचा दिवस असल्यामुळे गटारी अमावास्या साजरी करण्यासाठी रविवारला अधिक प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून मासे खाणे टाळले जाते.