‘अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध’; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

मुंबई : शिवसेनेच्या नंतर आता राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरू होता. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडणार होती हे स्पष्टच होतं. या संघर्षातूनच शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता, असं सांगतानाच सुप्रिया सुळेंकडे पक्षाची जबाबदारी दिली तर अजित पवार सोडून जातील का याची चाचपणी शरद पवार यांनी केली. पण सुप्रिया सुळेंकडे जबाबदारी दिल्यानंतर अजितदादा सोडून जात नसल्याची खात्री पटल्यावर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला.
हेही वाचा – समाजसेवक आकाश दीपक महालपुरे यांचे उध्दव ठाकरे यांना पत्र!
शरद पवार यांनी सुप्रिय सुळेंना कार्याध्यक्षपद दिलं. पण दुसरीकडे अजित पवार यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा सुरू केल्या होत्या. त्यांच्याशी अजितदादांच्या बैठका सुरू होत्या. प्रफुल्ल पटेल यात मध्यस्थी करत होते. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली होती. त्यामुळे भाजपमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे की नाही हे भाजपमध्ये ठरत नव्हते. त्याचं कारण म्हणजे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाला नितीन गडकरी यांच्या गटाचा आणि खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता, असं सांगतानाच अजितदादांना मुख्यमंत्री करायचे की नाही हा वाद अजूनही भाजपमध्ये सुरू आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.





