सुप्रिया सुळेंचा बारामतीतून मार्ग खडतर… अजित पवारांच्या साथीनं भाजप घड्याळ्याचे काटे उलटे फिरवणार?
![Supriya Sule, Baramati, Marg Khattar, Ajit Pawar, BJP, Clock, Kate Inte, Pavaranar?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/supriya-sule-ajit-pawar-780x470.png)
पुणे :
बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार मतदारसंघांवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वर्चस्व आहे. उर्वरित दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यातील भोर-वेल्हा-मुळशी या मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे आणि पवार कुटुंबाचे फार सलोख्याचे संबंध नाहीत. तसेच, पुरंदर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार समर्थक एकत्र आले, तर सुळे यांच्यासमोर चांगले आव्हान उभे राहू शकते. दरम्यान, काँग्रेसची भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची असल्याने दोन्ही आमदार सुळे यांना मदत करू शकतात. मात्र, सद्यस्थितीत बारामतीतील विविध मतदारसंघातून मताधिक्यासाठी सुळे यांना कष्ट करावे लागतील. त्याचवेळी राज्यभर फिरून इतर सहकाऱ्यांच्या प्रचाराचाही धुराही सांभाळावी लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या बहिण-भावाच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवारांशिवाय जिंकण्याचे आव्हान सुळे यांच्यापुढे उभे राहिले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या सहकार्याने बारामतीत ‘घड्याळाचे काटे’ उलटे फिरविण्याची अनेक वर्षांपासूनची भारतीय जनता पक्षाची इच्छा पुढील लोकसभेत फळाला जाणार का, हे लवकरच कळणार आहे.