महापालिका मुख्य लेखापरीक्षण विभागामध्ये कार्यरत ६ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मुदतवाढ
आयुक्त शेखर सिंह यांचा निर्णय : स्थायी समिती सभेत विविध विकासकामांना मंजुरी
![Municipality, Chief Audit, Working in Department, 6 Retired, Extension of Employees,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Shekhar-Singh-780x470.png)
- पिंपरी : महापालिका सभा आणि स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता शालेय साहित्य थेट संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या नवीन थेरगाव, नवीन भोसरी आणि ह.भ.प प्रभाकर मल्हारराव कुटे आकुर्डी रुग्णालय येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडील प्राप्त परवानगीच्या अनुषंगाने बँक गँरंटीची रक्कम भरण्याबाबत मान्यता देण्यात आली. पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या विविध विभागांचे लेखापरिक्षण करण्यासाठी मुख्य लेखापरीक्षण विभागामध्ये कार्यरत ६ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यांना पुन्हा ६ महिने कालावधीसाठी नियुक्ती देण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डन येथे स्थापत्य विषयक सुशोभीकरणाची कामे, प्रभाग क्रमांक १ मधील रस्ते मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्याच्या कामास बैठकीत मान्यता देण्यात आली. भामा-आसखेड प्रकल्पाअंतर्गत तळवडे-चिखली येथील प्रकल्पास वीजपुरवठा करणे तसेच पंपगृह चालन करणे व रावेत येथील पंपाचे रेट्रोफिटींग करणे या कामासाठी सन २०२३-२४ साठी तरतूद वर्गीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. दुबार विकास हक्क प्रमाणपत्र अदा करण्यासाठी शुल्क लागू करण्यात येणार आहे. त्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.