‘आगामी २०२४ ची शिरूर लोकसभा लढवणार अन् जिंकणार’; विलास लांडे यांचे विधान
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असा उल्लेख असलेले फलक लागले होते. त्यामुळे शिरूर लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचे आहे. दरम्यान, यावर आता विलास लांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विलास लांडे म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्त्याचीच मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका आहे. शेवटी पक्षश्रेष्टी ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायची. जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करेल. २०१९ पासूनच मी आगामी लोकसभेची तयारी करत होतो. आगामी लोकसभा निवडणुकीला अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांना माझा विरोध नाही.
हेही वाचा – ओवळे गावातील श्री. म्हसोबा देवस्थान मंदिराचे बांधकाम होणार नाही
खासदार म्हणून त्यांनी अनेक चांगली काम केलेले आहेत. ते चांगले कार्यकर्ते आहेत. विरोधाला विरोध करण्यापेक्षा चर्चा करावी. ते उभे राहत असतील तर माझा त्यांना विरोध नाही. मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून शंभर टक्के निवडून येईल असं सांगत जिंकण्याचा आत्मविश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे.