आयपीएल ९ सट्टेबाजांना अटक; हिंजवडीत सुरू होता ऑनलाइन क्रिकेट सामन्यावर सट्टा
![IPL, 9 bookies, arrested, Hinjewadi, online, cricket match betting,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/IPL-Satta-780x470.png)
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या ९ जणांना अनैतिक मानवी वाहतूक विभागाने अटक केली आहे. ४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन लॅपटॉप, तेरा मोबाईलचा यात समावेश आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या क्रिकेट सामन्यावर आरोपी सट्टा खेळत होते.
अवघ्या देशभर आयपीएल क्रिकेट सामने बघितले जात असून यावर बेटिंगदेखील मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचं समोर आलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेकदा सट्टा घेणाऱ्या आणि ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींवर कारवाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. हिंजवडी परिसरातील मारुंजी येथे वैभव बाबा राम डिक्कर आणि इतर काही व्यक्ती लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक विभागाला मिळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून सट्टा खेळणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीकडून दोन लॅपटॉप, तेरा मोबाईल असा एकूण ४ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, नागेश माळी यांच्या पथकाने केली.