१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी? राहुल नार्वेकर म्हणाले..
![Rahul Narvekar said that if the process is completed in 15 days, we will take a decision in 15 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Rahul-Narvekar--780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी निर्णय दिला आहे. न्यायालयाने नार्वेकरांना दिला आहे. राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर गेले होते. ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी होणार? यावर प्रतिक्रिया दिली.
राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाजवी कालावधीत निर्णय घ्यायचा आहे. तो वाजवी कालावधी किती दिवसांचा असेल, हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही. कारण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तोच वाजवी कालावधी असेल.
हेही वाचा – समीर वानखेडेंनी शाहरुखकडे २५ कोटी मागितले? सीबीआयचा गंभीर आरोप!
१६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ज्याकाही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वप्रथम राजकीय पार्टी कुणाची आहे? याचा निर्णय होणं आवश्यक आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे घटनेतील सर्व तरतुदींचा विचार करूनच योग्य निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यांवर मी टिप्पणी करत नाही. मला तशी टिप्पणी करायची गरजही नाही. त्यामुळे कुणी १५ दिवस, कुणी २० दिवस तर काहींनी दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पण मी याकडे लक्ष देत नाही. मी कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेणार आहे. कुणाच्या मनासारखं व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांत निर्णय घेऊ आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला, तर निर्णय घेण्यास विलंब होईल. कुणाचा आरोपांन घाबरून मी निर्णय घेत नाही, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.