मराठमोळ्या केदार जाधवची IPL मध्ये एन्ट्री! ‘या’ संघाकडून खेळणार
IPL 2023 : आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. प्लेऑफसाठी सर्वच संघात चुरस पाहायला मिळत आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान, आरसीबीच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा खेळाडू केदार जाधवला आरसीबीने संघात स्थान दिले आहे.
आरसीबीचा ऑलराउंडर डेव्हिड व्हीली दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी केदारला संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये कालपर्यंत कॉमेंट्री करणारा मराठमोळा खेळाडू आता थेट मैदानात खेळताना दिसणार आहे. केदार कालपर्यंत मराठीतून कॉमेंट्री करत होता. मात्र, आता तो आरसीबीच्या संघातून खेळणार आहे. केदारला आरसीबीने १ कोटी बेस प्राइजमध्ये आपल्या संघात घेतले आहे.
केदार जाधवने आयपीएलमध्ये २०१० साली पदार्पन केलं आहे. त्याने ९३ सामन्यांतील ८० डावांमध्ये १२३.१७ च्या स्ट्राईक रेटने १ हजार १९६ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. केदारने आपला शेवटचा सामना २५ सप्टेंबर २०२१ रोजी खेळला होता. केदार जाधव बॅटिंग, बॉलिंग आणि विकेटकीपिंग अशा तिन्ही भूमिका चोखपणे पार पाडतो.