breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ऐन दिवाळीत एसटी ठप्प?

वेतनवाढीवरून ३० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार

मुंबई : वेतनवाढीच्या करारानुसार चार हजार ८४९  रकमेचे वाटप करून शिल्लक राहणाऱ्या एक हजार ५०० कोटींचेही वाटप करावे, या  मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ३० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

एसटीत वेतनवाढीचा मुद्दा अजूनही संपुष्टात आलेला नाही. २०१६-२०२० या कालावधीतील वेतनवाढीसाठी जाहीर केलेल्या चार हजार ८४९ कोटी रुपयांच्या पॅकेजचे वाटप करताना वापरलेल्या सूत्रामुळे १,५०० कोटी रुपये शिल्लक राहात आहेत. त्याचे वाटप होणे गरजेचे आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

संघटनेचे कार्यकारिणी सदस्य ३० ऑक्टोबरला आझाद मैदानात उपोषण करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चालक-वाहकांनाही त्यात सामील करून आंदोलनाची धार तीव्र करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

वेतनवाढीच्या मुद्यावरून ८ व ९ जून २०१७ रोजी अघोषित काम बंद आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर एसटी महामंडळाने ४,८४९ कोटी रुपयांचा वेतन करार जाहीर केला. त्याचे वाटप कसे करणार याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने महामंडळाकडे मागितली. त्याला महामंडळाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संघटनेने नवीन वेतन करारावर स्वाक्षरीच केली नाही. वेतन करारातील रकमेचे वाटप करताना दीड हजार कोटी रुपये शिल्लक राहात आहे, त्याचे काय, असा सवाल कामगार संघटनेने एसटी महामंडळाला नुकत्याच दिलेल्या नोटीसमध्ये केला आहे.

ही कोंडी दूर करावी तसेच अघोषित संपात सामील झालेल्या कर्मचारी-कामगारांवरील निलंबन व अन्य कारवाई मागे घेण्यात यावी, भाडय़ाच्या शिवशाही बसवर खासगी चालक असल्याने व ते प्रशिक्षित नसल्याने अपघात वाढत आहेत. त्यामुळे या गाडय़ा भाडय़ाने न चालविता महामंडळाने स्वत: चालवाव्यात, यासह अन्य मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. तसे न झाल्यास ३० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी आझाद मैदान येथे संघटनेचे कार्यकारिणी सदस्य उपोषणास बसतील. ३१ ऑक्टोबर रोजी महिला कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू होईल. याची दखल न घेतल्यास १ नोव्हेंबरपासून राज्यातील विभागीय व मध्यवर्ती कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच एसटीचे चालक-वाहक उपोषणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आंदोलनाची धार वाढविण्यासाठी चालक-वाहकांना तसे छुपे आदेशच गेले आहेत. १ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त जादा गाडय़ांचे नियोजन केले आहे. चालक-वाहक उपोषणाला बसल्यास एसटी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने संप, बंद करण्यास एसटी संघटनेला मनाई केली आहे. त्यामुळे आपल्या मागण्यासांठी संघटनांकडून अघोषित संप, उपोषण अशा प्रकारे आंदोलन करून एसटी सेवा ठप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये दिवाळी भेट

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये, तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के इतकी अंतरिम वेतनवाढ, तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली जाणार आहे.

मंत्रालयात सोमवारी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१८ पासून ही वेतनवाढ लागू होईल. याबाबत अभ्यास करून महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांना अंतिम वेतनवाढ  दिली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येणार आहे.

एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात राज्य सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे ६ टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल. वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारित झाले आहे. त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमााणे २ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतील थकबाकीपैकी पाच हफ्त्यांची रक्कमही दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर १ नोव्हेंबरला  देण्याचे आदेश रावते यांनी महामंडळाला दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button