‘नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले’; आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
काँग्रेस पक्षात षडयंत्र चालू आहे
![Ashish Deshmukh said that Mahavikas Aghadi government fell due to Nana Patole](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/nana-patole-and-nana-patole-780x470.jpg)
मुंबई : आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत देशमुखांनी वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबनाची कारावाई करण्यात आली आहे. यानंतर आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणून नाना पटोलेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यायला पाहिजे होती, असं आशिषे देशमुख म्हणाले.
मी सातत्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हिताची गोष्ट कोण करत असेल, तर त्याला नोटीस देणे चुकीचे आहे. बजावण्यात आलेल्या नोटीसीला वेळेपूर्वीच शिस्तपालन समितीला उत्तर पाठवण्यात येईल, असं आशिष देशमुख म्हणाले.
काँग्रेस पक्षात षडयंत्र चालू आहे. ज्याची सुरूवात विधानसभेचे अध्यक्ष असताना नाना पटोले यांनी केली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तेव्हाच संशयाची सुई त्यांच्यावर गेली होती. तेव्हापासून षडयंत्र सुरू आहे. हे देखील माझ्या उत्तरात दाखल करणार आहे, असंही देशमुख म्हणाले.