शिक्षकांमध्ये सांगलीत हाणामारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Untitled-19-2.jpg)
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत गुरुजींनीच एकमेकांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला. सत्ताधारी गटाकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असता, विरोधक केवळ वल्गना करीत असून सभासदांच्या हिताआड येत असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला. त्यावरून शिक्षकांच्या दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ६६वी सर्वसाधारण सभा दीनानाथ नाटय़गृहात पार पडली. सुरुवातीपासूनच सभेत तणावाची स्थिती होती. सत्ताधारी शिक्षक समितीने सभागृहात पहिल्या रांगेतील खुच्र्यावर कब्जा केला होता. त्यात व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत जाण्यासाठीचा मार्गही खुच्र्या टाकून अडविला होता. यावरून सभेच्या सुरुवातीलाच विरोधी शिक्षक संघ थोरात गटाच्या समर्थकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली.
बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब कोले यांनी अहवाल वाचनाला सुरुवात केली. विरोधी संचालक विनायक शिंदे यांनी व्यासपीठासमोर येत अजेंडय़ावरील जागा व इमारत खरेदीचा विषय क्रमांक नऊ रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. शिंदे समोर येताच सत्ताधारी गटाचे संचालकही त्यांच्या दिशेने धावले. याच वेळी एक सभासद व्यासपीठावर धावून आला. तो संचालक बजबळे यांच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये झटापट झाली. यात दोघेही खाली पडले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. तोपर्यंत इतर संचालकही मदतीला धावले.
त्यांनी बजबळे यांना बाजूला घेऊन त्या शिक्षकाला मारहाण केली. या प्रकाराने सभागृहात गोंधळ उडाला. बंदोबस्तासाठी केवळ दोनच पोलीस सभागृहात असल्याने शिक्षकांचा गोंधळ रोखण्यात ते हतबल ठरले. याच गोंधळात अध्यक्ष रमेश पाटील यांनी अजेंडय़ावरील विषय वाचण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन मिनिटांत त्यांनी अजेंडय़ावरील १३ विषय वाचले आणि सभा संपल्याचे जाहीर करून काढता पाय घेतला.