‘छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध?’; इम्तियाज जलील
![Imtiaz Jaleel said what is the relationship of Chhatrapati Sambhaji Maharaj with Aurangabad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Imtiaz-Jaleel-780x470.jpg)
राज ठाकरेंना औरंगाबादमधून निवडणूक लढण्यास सांगा
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामांतर करण्यास केंद्राने मंजुरी दिली. यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. या विरोधात एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरू केलं आहे.
एका शहराचं नाव देऊन मला मोठं करा, असं छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं होतं का? महापुरूषांचा आदर करतो, त्यात दुमत नाही. पण, त्यांचं नाव घेऊन राजकारण सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध आहे? त्यांचा जन्म किंवा मृत्यू येथे झाला होता का? त्यांनी येथे काही काम केलं होतं का? किंवा त्यांचं स्मारक आहे?, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
तीस वर्षापूर्वी एका पक्षाचे मोठे नेते येथे येऊन म्हणतात, मला या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं आहे. त्यांची भावना विचारात घेऊन हा निर्णय घेतला जातो. तर, मी येथून निवडून आलेला खासदार आहे. ज्या लोकांनी औरंगाबादमध्ये जन्म घेतला आहे, त्यांच्या भावना नाहीत का?, असं जलील म्हणाले.
तुम्हाला औरंगाजेबचा पुळका का? असं विचारलं असता जलील म्हणाले की, औरंगाजेबाचा जन्मोत्सव किंवा पुण्यतिथी आम्ही साजरी करतो का? ते एक राजा होते. तरीसुद्ध काही लोकं सांगत आहेत, की मी संभाजी महाराजांचा विरोध करत असून, औरंगाजेबचं अनुकरण करतो. मात्र, तसं काही नाही, असं जलील म्हणाले.
दरम्यान, नामांतरण पटलं नसेल तर राजीनामा द्या, असं मनसेने म्हटलं आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, मनसेला जास्त महत्व देत नसल्याने त्यांना उत्तर देणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पक्षाच्या सर्वेसर्वांना औरंगाबादमधून निवडणूक लढण्यास सांगा, असं आव्हान जलील यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.