‘औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय योग्य नाही’; इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
![Imtiaz Jalil said that the decision to change the name of Aurangabad city is not right](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/imtiaz-jaleel-780x470.jpg)
आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लढा उभा करू
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुरूवातीला अश्याप्रकारे नाव बदलण्याला आमचा विरोध आहे. आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनेक कार्यक्रमांना मी हजेरी लावतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आदर आहेत. पण औरंगाबाद आणि औरंगजेबाचा काही संबंध नाही. मुस्लीम लोक त्याला मानत नाहीत. या नामांतराचं एक औरंगाबादकर म्हणून मला दु:ख आहे. पण नामांतराचा निर्णय योग्य नाही, असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लढा उभा करू, असंही ते म्हणाले.
नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील. आता औरंगाबादसाठी आमच्या शक्ती प्रदर्शनाची वाट पाहा. आपल्या लाडक्या शहरासाठी भव्य मोर्चा काढू! आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा. आम्ही निषेध करतो आणि आम्ही लढू, असं म्हटलं आहे.