उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! राष्ट्रवादीची खोचक टीका
![Free the state from the haters of Maharashtra at least](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Bhagat-Singh-Koshyari-and-sharad-pawar-780x470.jpg)
नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत अशी आशा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. अशातच राज्यपालांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो !, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन! ते संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा! त्यासाठी त्यांना शुभेच्छा!, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.