Chinchwad By Election : अर्ज मागे घेण्यावर राहुल कलाटेंनी मांडली भूमिका, म्हणाले..
मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही
पिंपरी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज निर्णयक दिवस आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच आज शिवसेनेचे उपनेते सचिन अहीर यांनी राहुल कलाटेंची भेट घेतली आहे.
सचिन अहीर यांनी उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करत अर्ज मागे घेण्याची विनंती केली. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कलाटे यांच्याशी संवाद साधला अशी माहिती सचिन अहीर यांनी दिली.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घ्यावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहीर मला भेटले. त्यानुसार मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की नाही यावर मी निर्णय जाहीर करेन, अशी प्रतिक्रिया उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली आहे.