कसोटी, एकदिवसीय सामन्यानंतर शुभमनची टी-२० मध्येही शतकी खेळी
![After Tests and ODIs, Shubman also scored a century in T20Is](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/shubman-gill-2-780x470.jpg)
शुभमन गीलने मोडला विराट कोहलीचा विक्रम
मुंबई : भारतविरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाचा टी-२० इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये आयर्लंडचा १४८ धावांनी पराभव केला होता. तर न्यूझीलंडचा हा टी-२० इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ४ गडी गमावून २३४ धावसंख्या उभारली होती. भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गीलच्या शतकी पारीमुळे भारतीय संघाच्या धावसंख्येत भर पडली. शुभमनने ६३ चेंडूत ७ षटकार आणि १२ चौकार लगावत १२६ धावांची जबरदस्त खेळी केली.
प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १२.१ षटकात ६६ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक म्हणजे ३५ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार मिचेल सँटनरने १३ धावांचे योगदान दिले. या दोघां व्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याचबरोबर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या वेगवान गोलंदाजांनी २ बळी घेतले.
दरम्यान, शुभमन गीलने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने विराट केहलीला मागे टाकले आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यानंतर आता टी-२० मध्येही शुभमनची शतकी खेळी.