breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
भाजप आमदारांच्या निषेधावरुन पिंपरी पालिकेच्या महासभेत विरोधकांचा गोंधळ
पिंपरी ( महा ई न्यूज ) – दहीहंडी उत्सवात मुंबईतील घाटकोपरचे आमदार व भाजप प्रवक्ते राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आज (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम कदम यांच्या निषेधाची मागणी करत चांगलाच गोंधळ घातला.
तसेच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना आयुक्तांनी दिलेल्या अपमानस्पद वागणूकीमुळे राष्ट्रवादीने डोक्यावर काळ्या पट्टी बांधून सत्ताधारी भाजपसह आयुक्तांचा निषेध व्यक्त केला.
आमदार राम कदम दरवर्षी दहीहंडी उत्सव दणक्यात करतात. सेलिब्रिटींची हजेरी त्याला असते. यावेळी, तर मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. ते येण्यापूर्वी कदम यांनी भाषण केले. मतदारांची कुठली कुठली कामे करू असे सांगताना त्यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एखाद्या तरुणाला नकार दिलेल्या तरुणीला पळवून आणून मी त्याला मदत करीन, असे वक्तव्य कदम यांनी केले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेविका मिनल यादव यांनी सुरूवातीलाच भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. कदम यांच्यावर सभागृहाच्यावतीने निषेध करण्याची त्यांनी मागणी केली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी राम कदम यांच्या प्रवृत्तीचा धिक्कार व्यक्त करत निषेधाचा ठराव सभागृहात मांडला. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनीही निषेधार्थ घोषणा दिल्या. मात्र त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, महापौर राहुल जाधव यांना ही निषेधाची मागणी सभागृहात करू नये, असे वक्तव्य केले. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या डायसवर धाव घेतली.