उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल म्हणाले, ज्यांची कमावण्याची हिंमत नाही ते सगळं चोरतायत
![Uddhav Thackeray attacked Shinde group. He said, those who don't dare to earn steal everything](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/udhav-Thakre-555-768x470.jpg)
मुंबई ः नागपूरात सध्या राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून ज्यातील विविध मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. नागपूरात पत्रकारांशी संवाद साधताना बंडखोर शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की,दगाफटका आपल्यासाठी काही नवीन नाही, शिवसेना प्रमुखांना एक शब्द आवडत नव्हता, अजात शत्रू… अजात शत्रू म्हणजे काय ज्याला शत्रू नाही तो. शत्रू नाही तो कसा मर्द? जो मर्द असतो त्याचा शत्रू असतो. ज्याची कमावण्याची काही हिंमत, लायकी नाही ते सगळं चोरतात.
….पण हिंमत नाही चोरू शकत
शिवसैनिकांच्या मेहनतीवर निवडून आले आणि आता पलीकडे गेले. जाताना गेले ते गेले आता माझे वडील चोरतायत, पक्षाचं नाव चोरतायत, धनुष्यबाण चोरतायत हरकत नाही, तुम्ही बाकी सगळ चोरू शकता पण हिंमत नाही चोरू शकत. हिंमत ही अंगात असावी लागते, धमक ही अंगात असावी लागते आणि तिकडे तुम्हाला दाखवून देऊ बाळासाहेबांची शिवसेना कोणती… त्यांनी काय केलं ते आत्तानाही कळणार, सामन्याला समोर या मग दाखवतो काय ते खरं काय आणि खोटं काय, असा इशाराही शिंदे गटाला दिला आहे.
फोटो काढण्याची अक्कल नाही आणि निघाले राज्य करायला
नागपूरात आलो तेव्हा सगळे होर्डिंग बघत होतो आपले कोणते आणि तोतये कोणते? दोन्ही पोस्टरवर बाळासाहेबांचे पोस्टर, बाळासाहेब चोरायला प्रयत्न चालला तो चालला पण निदान फोटो ते सुद्धा मी काढलेले लावत आहेत, म्हणजे फोटो काढण्याची पण अक्कल नाही आणि निघाले मोठे, राज्य करायला. हे असे बुडबुडे जास्त काळ टीकत नाहीत, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.
शिंदे गटाला भाजप टाचणी लावत नाही ना?
शिंदे गटाला टाचणी आपण तर लावूच, पण भाजप टाचणी लावत नाही ना? कारण ज्याप्रकारे त्यांची भ्रष्टाचाराची एक एक प्रकरण बाहेर यायला लागली ही बरोबर शिंदे गटातील मंत्र्यांचीच का येत आहेत? हा विचार त्यांनी केला पाहिजे, अशी शंकाही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली आहे.
कोणी कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात लोकशाही आणि ती टिकवायची आहे म्हणून रणशिंग फूंकुन लढाईला मैदानात उतरलो आहे. लोकशाहीत गुप्त मतदान असतं, पण गुप्त मतदानात मी कोणाला मतदान केलं हे समोरच्याला कळता कामा नये आणि समोरच्याने कोणाला मतदान केलं हे मला कळता कामा नये, याला गुप्त मतदान म्हणतात. पण आत्ता असं व्हायला लागलं आहे की, आपलं मतदान आपल्यापासून गुप्त राहायला लागलं आहे. मतदान केलं कोणाला, ते कुठून कोणाकडे गेलं इथून सुरतेला कसं गेलं, सुरतेवरून गुवाहाटीला कसं गेलं, गुवाहाटीवरून गोवा, गोव्यावरून पुन्हा दिल्ली आणि दिल्लीवरून हे मत कसं येरझाऱ्या मारायला लागलं हे आपलचं आपल्याला समजलं नाही. अशापरिस्थिती आपल्याला पुढे जायचं आहे, असही कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गटाला आव्हान देताना उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार नाही हे यांनी जाहीर करावं लागणार आहे. राजकीय आयुष्यातली ही शेवटची लढाई असून यापुढे विजयाची सुरुवात असेल. आपल्याच लोकांनी पाठीत वार केले, अशी खंतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणावेळी मोदींनी जनतेचे पैसे लुटणाऱ्या लोकांना एक्सपोज करा म्हटलं. पण मग त्यांच्या बाजूला कोण बसल होत? पंतप्रधान एकटे प्रामाणिक असतील पण बाजूला भ्रष्टाचार करणारे बसले होते असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.