ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता
![Senior lawyer Dr. Birendra Saraf is the new Advocate General of Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Bijendra-678x470.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाने विद्यमान एजी आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानंतर सराफ यांची महाराष्ट्राचे पुढील महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर वरिष्ठ वकील बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे पुढील महाधिवक्ता बनणार आहेत.
सराफ गेल्या 25 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत, मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि पदवीच्या तीनही वर्षात मुंबई विद्यापीठात ते टॉपर होते. कनिष्ठ वकील म्हणून त्यांनी विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये काम केले. तर सराफ यांची 2020 मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सहा वर्षे बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले आणि सध्या ते उपाध्यक्ष आहेत.
बिरेंद्र सराफ यांनी त्याच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल आणि वादग्रस्त प्रकरणे हाताळली आहेत. बॉलिवुड अभिनेत्रीच्या घरावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणात सराफ यांनी कंगनाची बाजू मांडली होती. तसेच आर्यन खान ड्रग प्रकरणादरम्यान यापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख असलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.