गोवरबळींची संख्या ११; सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक मृत्यू
मुंबई : गोवंडी येथील सव्वा वर्षांच्या मुलीचा सोमवारी गोवरने संशयित मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी नालासोपारा येथील एक वर्षांच्या मुलाचा मुंबईतील रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईमध्ये सलग दोन दिवस गोवरने दोन बालकांचा संशयित मृत्यू झाला. मृतांची संख्या ११ झाली असून, त्यातील आठ बालकांचा मृत्यू गोवरने झाल्याचे निश्चित झाले आहे. मुंबईमध्ये मंगळवारी १२ नवे रुग्ण आढळून आले असून, रुग्णांची संख्या २२० झाली आहे. तर नऊ बालकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
नालासोपारा येथील एक वर्षांच्या मुलाला एक महिन्यापासून अधूनमधून ताप व खोकल्याचा त्रास होत होता. १२ नाव्हेंबरला त्याच्या अंगावर पुरळ आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला न्यूमोनियाचे निदान झाल्याने त्याला मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र १८ नोव्हेंबरला शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागल्याने त्याला जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. २२ नोव्हेंबरला श्वसन प्रक्रिया बंद होऊन मृत्यू झाला. या लहान मुलाला गोवरची कोणतीच लस देण्यात आली नव्हती.
सोमवारी मुंबईच्या कुर्ला विभागात तीन, गोवंडी आणि सँडहस्र्ट रोड भागात प्रत्येक दोन तसेच दादर, प्रभादेवी, अंधेरी, मालाड आणि गोरेगाव या भागात प्रत्येकी एक गोवरचा रुग्ण सापडला आहे. तसेच मंगळवारी १७० संशयित रुग्ण आढळून आल्याने संशयित रुग्णांची संख्या ३,३७८ झाली आहे.
दोन हजार मुलांचे लसीकरण
गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियमित तसेच अतिरिक्त लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. त्यानुसार मंगळवारी महापालिकेकडून नियमित २३० तर अतिरिक्त १४३ लसीकरण सत्रे घेण्यात आली आहे. यामध्ये नियमित सत्रांमध्ये ५८८ बालकांना एम आर १ तर एमएमआरचे ६२० बालकांना मात्रा देत १२०८ मुलांचे लसीकरण झाले तर अतिरिक्त सत्रामध्ये ३७५ बालकांना एमआर १ तर ४४८ बालकांना एमएमआरची मात्रा देत ८२३ बालकांचे लसीकरण करण्यात आले.