कर्ज परतफेडीचे आमिष दाखवून विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं
नागपूर : कर्जाची परतफेड करण्याचे आमिष दाखवून एका तरुणाने विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नकळत अश्लील छायाचित्र काढले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिचे शोषण करू लागला. महिलेने विरोध केला असता आरोपी तरुणाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. पीडितेने घटनेची तक्रार हुडकेश्वर पोलिसात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. अभिषेक मुन्नालाल गुप्ता (३२) रा. विज्ञाननगर असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.
पीडित ३९ वर्षीय महिला आणि तिच्या पतीचे किराणा दुकान आहे. अभिषेक खासगी कंपनीत सेल्समनचे काम करतो. त्यामुळे त्याचे महिलेच्या दुकानात येणे-जाणे होते. या दरम्यान अभिषेकने महिलेला विश्वास दिला की, तो तिच्यावर असलेले बँकेचे सर्व कर्ज फेडून देईल. महिला त्याच्या जाळ्यात अडकली. अभिषेकने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिच्या न कळत छायाचित्रही काढले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितेचे शोषण करू लागला.