ब्रेकिंग न्यूज ! अजितदादा पुन्हा नॉट रिचेबल; 4 नोव्हेंबरपासून कुणाच्याही संपर्कात नाहीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Ajit-Pawar.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचं बोललं जातंय. त्याला कारणही तसंच आहे. राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरातून अजित पवार आजोळी गेल्याचं सांगितलं जात असलं तरी अजित पवार अचानक पाच दिवसांपासून नॉट रिचेबल झालेत. गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे.
परंतु अजित पवार शिर्डीच्या शिबिरातूनच 4 नोव्हेंबर रोजी आजोळी देवळाली प्रवराला गेल्याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. खरं तर अजित पवार अद्यापही देवळाली प्रवराला पोहोचलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही स्वतः शरद पवारांनी रुग्णालयातून शिर्डीत हेलिकॉप्टरने येत हजेरी लावली होती. परंतु त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील राज्यस्तरीय शिबिरानंतर अजितदादा कुठेही दिसलेले नाहीत. नेहमीच मीडिया आणि बातम्याच्या गराड्यात राहणारे अजित पवार अचानक पाच दिवस गायब झाल्यानं नव्याच चर्चांना उधाण आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील राज्यस्तरीय शिबिरातील पहिल्या दिवशी 4 नोव्हेंबर रोजी अजित पवारांचं जवळपास दीड तास भाषण झालं. त्यानंतर त्यांनी शिर्डीतून काढता पाय घेतला. खरं तर ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवारांनी शिर्डीत येत या शिबिराला 5 नोव्हेंबर रोजी उपस्थिती दर्शवली होती आणि त्याच दरम्यान अजित पवार या शिबिरातूनच दिसेनासे झाल्यानं वेगळ्याच गोष्टींची पाल चुकचुकत असल्याचं बोललं जातंय.
विशेष म्हणजे अजित पवार नॉट रिचेबल झालेले असतानाच मनसेही राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यास सुरुवात केलीय. मनसेचे नेते गजानन काळेंनी ट्विट करत अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर नाहीत ना, असा टोलाही आमदार अमोल मिटकरींना लगावलाय. तसेच अमोल मिटकरींना यासंदर्भात खुलासा करण्याचंही आव्हान केलंय. अजित पवारांनी कंपू बदलला तर तुमची पळता भुई थोडी होईल, असं म्हणत मनसे नेते गजानन काळेंनी मिटकरींच्या आडून राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केलाय. यापूर्वीही अजितदादा दिल्लीच्या पक्षाच्या अधिवेशनातून शेवटच्या दिवशी गायब झाले होते. त्यातच गेले काही दिवस अजितदादा राष्ट्रवादीत नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजितदादा 4 नोव्हेंबरपासून कुठे आहेत याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.