गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला
![Flyover at Golf Chowk opened for traffic from December](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/golf-bridge-780x470.jpg)
येरवड्यातील गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबरअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उड्डाणपुलाच्या कामाची बुधवारी पाहणी केली. त्यावेळी उड्डाणपुलाची अंतिम टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली.
अधीक्षक अभियंता सुष्मिता शिर्के, कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर, उपअभियंता संदीप पाटील, शाखा अभियंता रणजित मुटकुळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, राहुल भंडारे, श्वेता गलांडे, मुक्ता जगताप यावेळी उपस्थित होते. यावेळी नवी खडकी गावाकडे जाणारा रस्ता खुला ठेवावा, अशी सूचना मुळीक यांनी केली.नगर रस्त्यावर गुंजन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्रीनगर या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ती नियंत्रणात आणण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी उड्डाणपुलाची संकल्पना मांडली होती. त्यासाठी अंदाजपत्रकात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.