विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पक्षीय राजकारण
![Party politics for the first time in university assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/SPPU-780x470.jpg)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पक्षीय राजकारण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांनी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची घोषणा करून पदवीधर गटासाठी दहा जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोमवारी महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या माध्यमातून विद्यापीठाच्या अधिसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष रवीकांत वरपे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्य अध्यक्ष सुनील गव्हाणे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडे, राज्य विस्तारक राजेश पळसकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद लाड, प्रदीप देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. २० नोव्हेंबरला होणाऱ्या पदवीधर गटातील निवडणुकीसाठी संजय यादव, आकाश झांबरे, बाकेराव बस्ते, सोमनाथ लोहार, नारायण चापके, महेंद्र पठारे, तबस्सुम इनामदार, अजिंक्य पालकर, संदीप शिंदे, विश्वनाथ पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पदवीधरची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी पुणे, नगर आणि नाशिक येथे होणार आहे, तर मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी पुणे विद्यापीठात होईल.
जगताप म्हणाले, की विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत आतापर्यंत पक्षीय राजकारण नव्हते. मात्र अनेक वर्षांपासून एका विशिष्ट विचाराच्या लोकांची विद्यापीठात सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांतील भोंगळ कारभाराला, भ्रष्टाचाराला विरोध व्हायला हवा. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चार असे दहा उमेदवार पदवीधर गटाची निवडणूक लढवतील. पदवीधरचे पुणे जिल्ह्यात ४६ हजार, नाशिकमध्ये २६ हजार आणि नगरमध्ये सोळा हजार उमेदवार आहेत. पुढील काही दिवसांत अधिकृत जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल. पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली जाईल.
आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, आदित्य शिरोडकर विद्यापीठ निवडणुकीत लक्ष घालणार आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाईल, असे थरकुडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘विद्यापीठ विकास मंच’च्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाशी संबंधित एकत्र आले आहेत. विद्यापीठ विकास मंचच्या दहा उमेदवारांनी या पूर्वीच अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता भाजपाशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल आमनेसामने येऊन अधिसभा निवडणुकीत लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.