राज्यातील जमीन मोजण्या प्रलंबित; निकाली काढण्यासाठी आणखी सहा महिने?
पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक (सव्र्हेअर) पदासाठीची १०२० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र करोना आणि मनुष्यबळाअभावी राज्यभरातील जमिनींच्या तब्बल एक लाख तीन हजार मोजण्या प्रलंबित आहेत. भरती प्रक्रिया, नव्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होऊन कामावर रुजू होईपर्यंत प्रलंबित मोजण्या निकाली काढण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून डिसेंबर २०२१ मध्ये १०२० भूकरमापक भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, शासनाच्या इतर विभागांत परीक्षा प्रक्रियेत घोटाळय़ाचे प्रकार निदर्शनास आले. घोटाळय़ात समोर आलेल्या कंपनीकडूनच भूमी अभिलेखची परीक्षा होणार होती. त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आयबीपीएसकडून परीक्षा घेण्याला मान्यता देण्यात आली आहे. जमीन मोजणीसाठी साध्या, तातडीच्या, अति तातडीच्या आणि अति-अति तातडीच्या मोजण्या केल्या जातात. साध्या मोजणीसाठी सहा महिने, तातडीच्या मोजणीसाठी तीन महिने, अति तातडीच्या मोजणीसाठी एक महिना, तर अति-अति तातडीच्या मोजणीसाठी १५ दिवसांचा कालावधी असतो. करोनातील टाळेबंदीमुळे सध्या अति-अति तातडीच्या मोजण्यांची संख्या वाढली आहे. मात्र, मनुष्यबळ नसल्याने मोजण्या प्रलंबित आहेत.




