देशातल्या सर्व गतिविधींचा कणा हिंदू समाज आहे : प्रा अनिरुद्ध देशपांडे
![Hindu society is the backbone of all activities in the country: Prof. Anirudh Deshpande](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-03-at-4.22.08-PM-780x470.jpeg)
पुणे : देशातल्या सर्व गतिविधींचा कणा हिंदू समाज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री.अनिरुद्ध देशपांडे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कात्रज भागाच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमीच्या शस्त्रपुजन कार्यक्रमात केले. या प्रसंगी व्यासपीठावर कात्रज भागाचे सह संघचालक श्री शिवाजीराव मालेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. श्री पंढरीनाथ लोणकर (क्षत्रिय मराठी वारकरी संप्रदाय दिंडी क्र ९७ चालक) उपस्थित होते.
श्री.अनिरुद्ध देशपांडे पुढे म्हणाले की, आपल्या परंपरेत विजयादशमी उपासनेचा दिवस आहे, असुरी शक्तीवरती विजयाचा दिवस आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.याच दिवशी भारतरत्न पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी याच दिवशी बंधू भावाचा उद्घोष करणाऱ्या बौद्ध मताचा स्वीकार केला. संघ देशभरात सर्वव्यापी झाला आहे. संघाचे उद्दिष्ट हा समाज सुखद व्हावा,या समाजाला परम वैभव प्राप्त व्हावे हे संघाचे उद्दिष्ट आहे. देशातल्या सर्व गतिविधींचा कणा हिंदू समाज आहे.
संघ म्हणजे समाज आणि समाज म्हणजे संघ हे सूत्र आहे. संघाचे काम या देशात राष्ट्रीय विचार वाढवणाऱ्या स्वयंसेवकांचा समूह निर्माण करणे, हे कार्यकर्ते देशाच्या विविध क्षेत्रात जाऊन कर्तृत्व गाजवून या मातृभूमीला संपन्न करतील. संघ काम व्यक्तीनिर्माणचे काम आहे. या देशाची रचना हिंदुत्वाच्या संस्कृतीवर झाली आहे. भिन्न भिन्न प्रथा, परंपरा, भाषा, प्रार्थना पद्धती असलेल्या समाजात हिंदुत्व ही एक संस्कृती आहे.
या भिन्नतेने कधी देशाच्या एकत्मतेवर हल्ला केला नाही. हिंदुत्वाची एकात्मता हि समाजाचा दुभंग करून होणारी नाही. संघाचे हिंदुत्व हे समाजचे एकात्म जपणारे आहे. संघात जातीव्यवस्था नाही, जात निर्मूलन हे संघ कार्य आहे. मनुष्याने मनुष्याच्या असलेल्या सर्व गुणाची, वैशिष्ट्यांची कदर केली पाहिजे त्याचा स्वीकार केला पाहिजे. संघ अनुकूलतेत वर्धिष्णू आहे तर प्रतिकूलते मध्ये सुद्धा वर्धिष्णू आहे. प्रतिकूल काळात स्वयंसेवकांचे स्वयंसेवकत्व उजळून निघते.
परकीय शक्ती आज आपल्या राष्ट्राची संस्कृती संपवण्याचे प्रयत्न करत आहे. या राष्ट्राची ताकद या राष्ट्राची संस्कृती आहे. हिंदू समाजाचा अर्थ जो या संस्कृती चा स्वीकार करतो तो हिंदू आहे. उपासना पद्धती वेगळी असू शकते पण आपली संस्कृती एक आहे. हे संस्कृती जपण्याचे कार्य संघ करत आहे. पर्यावरण स्वरंक्षणाचे कार्य संघ करत आहे, पर्यावरणाचा ढळणारा तोल सांभाळण्यासाठी संघ स्वयंसेवक कार्य करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाकडे जाताना संघ कार्य हे समाज कार्य म्हणून आपण स्वीकारावे लागणार आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पंढरीनाथ लोणकर यांनी सुद्धा आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास भागातील स्वयंसेवक, नागरिक माता- भगिनींची, मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होत. एकूण उपस्थितांच संख्या ४२९ इतकी होती.
शस्त्रपुजन कार्यक्रमाच्या सुरवातीला ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थित संघ स्वयंसेवकांनी प्रत्युत प्रचलनम्,योगासने, पदविन्यास, दंड युद्ध, यष्टी, लाठी काठी, घोष आदी प्रात्याक्षिके सादर केली.