६५ कोटींचा निधी प्रभाग कामांसाठी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pmc-1-4.jpg)
- रक्कम वर्ग करण्यास पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेची मान्यता
महापालिकेच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात शहरातील विविध विकासकामांसाठी प्रस्तावित असलेली ६५ कोटी रुपयांची रक्कम प्रभागातील लहान-मोठय़ा कामांसाठी वळविण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने ६५ कोटी रुपयांची ही रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. एकूण पावणेतीनशे प्रस्तावांच्या माध्यमातून ६५ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकातील निधी वळविण्यात आला आहे.
महापलिकेचे चालू आर्थिक वर्षांची म्हणजे २०१८-१९ मधील अंदाजपत्रकाची एप्रिल महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली. अंदाजपत्रकाला मान्यता मिळाल्यानंतर त्यामध्ये काही कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. अंदाजपत्रकातील हा निधी प्रभागातील काही कामांसाठी देण्यात यावा, असे प्रस्ताव नगरसेवकांकडून देण्यास सुरुवात झाली होती. महापालिकेच्या परिभाषेत अशा प्रस्तावांना वर्गीकरणाचे प्रस्ताव म्हटले जाते. स्थायी समितीकडून या प्रस्तावांना प्रारंभी मंजुरी देण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतर मुख्य सभेपुढे वर्गीकरणाचे हे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यातील एकूण प्रस्तावांपैकी दोनशे प्रस्तावांना मुख्य सभेने एका तासातच मंजुरी दिली.
रस्ते, पदपथ व विद्युतव्यवस्थेवर भर
प्रामुख्याने रस्ते, पदपथ, विद्युत व्यवस्था, तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्तावित असलेला हा निधी ज्यूट बॅग खरेदी करणे, प्रभागासाठी बाके खरेदी करणे, सांडपाणी वाहिन्या बदलणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रभागात विद्युत व्यवस्था करणे अशा कामांसाठी वळविण्यात आला आहे. किमान सात लाख रुपयांपासून ते तब्बल एक कोटी ५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्यासाठी वर्ग करून घेण्यात आली आहे.