नवरात्रोत्सवात राज्याच्या सर्वच भागात अंशत: ढगाळ वातावरण
![Partly cloudy weather in all parts of the state during Navratri festival](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/monsoon-1-780x461.jpg)
नवरात्रोत्सवात राज्याच्या सर्वच भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे. तुरळक भागात सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात मात्र पावसाची विश्रांती कायम राहणार असून, तुरळक भागांतच हलक्या पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लागली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, दिवसा बहुतांश वेळेला आकाश अंशत: ढगाळ होत आहे. रात्री अनेक भागांत निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण होत आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी असणार आहे. तुरळक भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यांतही या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाचा परतीचा प्रवास कुठे?
उत्तर-पश्चिम राजस्थानातील काही भागांतून २० सप्टेंबरला मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. उत्तरेकडील काही भागांत सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसांत पाऊस उत्तरेकडून मागे फिरलेला नाही. मात्र, पुढील तीन ते चार दिवसांत पावसाच्या परतीच्या प्रवासाला अनुकूल स्थिती तयार होऊन, या कालावधीत तो उत्तरेकडील काही भागातून परतीचा प्रवास करेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.