महाराष्ट्र सगळ्याचबाबतीत सरस तरीही Vedanta Foxconn प्रोजेक्ट गुजरातला का गेला असावा…. : उदय सामंत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Uday-Samant.png)
गुजरातने Vedanta Foxconn कंपनीला महाराष्ट्रापेक्षा १२ हजार कोटींनी कमीचे पॅकेज दिले
तरीही हा प्रकल्प गुजरातमध्ये का गेला
महाराष्ट्राने प्रकल्पासाठी तब्बल ३९ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते
मुंबई: Vedanta Foxconn कंपनीचा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्प गुजरातमध्ये का गेला, यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना विचारणा केली असता त्यांनी केवळ आपल्या सरकारचा बचाव केला. पण जेव्हा हा प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) का गेला, याचे कारण विचारले तेव्हा उदय सामंत यांनी, ‘हा प्रश्न वेदांता समूहाच्या प्रमुखांनाच विचारायला पाहिजे’, असे सांगत फारकाही बोलणे टाळले. वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवालच सांगू शकतील की, ते तोटा सहन करुन गुजरातला का गेले?, असे उदय सामंत यांनी म्हटले.
उदय सामंत हे बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच Vedanta Foxconn प्रकल्पासाठी वेगाने हालचाली केल्याचा दावा केला. राज्य सरकारने १५ जुलैला हाय पॉवर कमिटीची बैठक घेऊन Vedanta Foxconn प्रकल्पासाठी तब्बल ३९ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांपेक्षा महाराष्ट्राने Vedanta Foxconn ला दिलेले आर्थिक पॅकेज नक्कीच चांगले होते. आपली तळेगाव येथील जमीनही गुजरातच्या धोलेरापेक्षा चांगली होती. याशिवाय, तळेगावमधील इतर सुविधाही गुजरातपेक्षा सरस होत्या. तरीही वेदांता समूहाने या प्रकल्पासाठी गुजरातची निवड का केली, हे समजत नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले. उदय सामंत यांच्या या अतिसावध भूमिकेमुळे आता आणखी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तर दुसरीकडे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनीही पत्रकार परिषद घेऊन Vedanta Foxconn प्रकल्पासाठी तळेगावची जागा निश्चित झाल्याचा दावा केला. गुजरातने Vedanta Foxconn कंपनीला महाराष्ट्रापेक्षा अधिक चांगलं पॅकेज दिलं का, असा प्रश्न यावेळी सुभाष देसाई यांना विचारण्यात आला. यावर सुभाष देसाई यांनी म्हटले की, माझ्या माहितीनुसार गुजरातने Vedanta Foxconn कंपनीला महाराष्ट्रापेक्षा १२ हजार कोटींनी कमीचे पॅकेज दिले आहे. तरीही हा प्रकल्प गुजरातमध्ये का गेला, याचा विचार व्हायला पाहिजे, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्याकडून जानेवारी महिन्यात सर्व वाटाघाटी पार पडल्याचा जो दावा केला जात आहे, तो खोटा आहे. फॉक्सकॉन कंपनीने ५ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा या चार राज्यांना पत्र पाठवले होते. त्यावेळी तुम्ही आम्हाला काय सुविधा देऊ शकाल, यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडीकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. तेव्हाच हायपॉवर कमिटीची बैठक घेऊन फॉक्सकॉनला आर्थिक पॅकेज दिले असते तर हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला नसता. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मंत्रालयात यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी अग्रवाल यांनी राज्य सरकारने आमच्याशी कोणताही सामंजस्य करार केला नाही किंवा हायपॉवर कमिटीची बैठक झाली नाही, असे सांगितले. हायपॉवर कमिटीची बैठक होत नाही तोपर्यंत कोणताही उद्योजक विश्वास ठेवत नाही. ही बैठक १५ जुलै २०२२ रोजी झाली. त्यावेळी ३८८३१ कोटीचे पॅकेज मंजूर करण्यात आले. मात्र, त्यानंतरही हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही, याचे दु:ख आम्हाला असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.