हिंदुराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर हल्ला करणाऱ्यांची नावे आली समोर
![The names of those who attacked Hindu Rashtra Sena's Tushar Hambir came out](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/New-Project-27-1.jpg)
पुणे : हिंदुराष्ट्र सेनेशी संबंधित असलेल्या हडपसर भागातील गुंड तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात पिस्तुलातून गोळीबार तसेच शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.प्राथमिक तपासात संशयित आरोपींचे नावे निष्पन्न झाली असून सागर ओव्हाळ, बाळा ओव्हाळ, इनामदार अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत तुषार नामदेवराव हंबीर (वय ३५, रा. गोंधळेनगर, हडपसर) याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हंबीर याच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. हंबीर याला स्नायुदुखीचा त्रास होत असल्याने २५ ऑगस्ट रोजी त्याला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करम्यात आले होते. ससून रूग्णालयातील इन्फोसिस इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील कक्षात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हल्लेखोर इमारतीत शिरले. एका हल्लेखोराने हंबीरवर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यानंतर हल्लेखाेरांनी हंबीरवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलीस कर्मचारी बागड आणि हंबीर याचा मेहुणा मध्ये आले. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याने बंदुक रोखल्याने पाच हल्लेखोर पसार झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.
ससून रुग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात येते. ससून रुग्णालयाच्या आवारात गुंड तुषार हंबीरवर हल्ला करण्यात आल्याने सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.