वाजपेयींना संयुक्तराष्ट्रांत आदरांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/atal-bihari.jpg)
न्युयॉर्क – भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे आदर्श राजनितीज्ञ होते अशा शब्दात संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेर्रेस यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. संयुक्तराष्ट्रांतील भारतीय कार्यालयात जाऊन त्यांनी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. त्यांनी वाजपेयी यांच्या कुटुंबियांना आपल्या संवेदना कळवल्या आहेत.
वाजपेयी यांच्याशी झालेल्या भेटीच्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला. ते म्हणाले की भारत आणि युरोपियन समुदायाची शिखर बैठक झाली त्यावेळी वाजपेयींशी माझी भेट झाली होती. त्यांनी भारत आणि जगाच्या शांतता आणि विकासासाठी सातत्याने काम केले.
अतिशय निस्वार्थी पणाने आणि त्यांनी निष्ठेने त्यांनी आपली ही मोहीम चालू ठेवली होती असेही त्यांनी नमूद केले. पेरू, इस्त्रायल, नायजेरीया, पॅलेस्टाईन, स्वीत्झर्लंड, पाकिस्तान, जपान इत्यादी देशांच्या राजदूतांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. भारतीय दूतावासाच्या रजिस्टर मध्ये त्यांनी आपले शोक संदेश नमूद केले आहेत.
वाजपेयी यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधात सुधारणा केली, ते सार्क संघटनेचे समर्थक होते आणि प्रादेशिक सहकार्य व विकासाला त्यांनी प्राधान्य दिले असे पाकिस्तानी राजदूतांनी नमूद केले आहे.