कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींसाठीच राफेलच्या करारात फेरबदल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/anil-amba.jpg)
लंडन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या लाभासाठीच राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा केला असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांशी बोलताना केला. ज्याने आयुष्यात कधीही विमान बनवले नाही त्याला विमाने तयार करण्याचे कंत्राट देऊन मोदींनी त्यांच्यावर मेहरबानी केली. कारण अनिल अंबानी हे सध्या कर्जबाजारी आहेत त्यांच्यावर 45 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे.
राफेलचा गैरव्यवहार नेमका कसा झाला याचा तपशीलही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केला. ते म्हणाले की युपीए सरकारच्या काळात फ्रांसशी आम्ही 126 विमाने खरेदी करण्याचा करार केला होता व आमच्या विमानाची किंमत होती 520 कोटी रूपये. मोदी अनिल अंबानी यांना घेऊन फ्रांसला गेले.मोदींनी हा करार बदलला आणि 126 ऐवजी केवळ 36 विमाने खरेदी करण्याचा त्यांनी फेरकरार केला आणि त्यांनी खरेदी केलेल्या प्रत्येक विमानाची किंमत 1600 कोटी रूपये इतकी आहे.
520 कोटी रूपयांचे विमान अचानक 1600 कोटी रूपयांना कसे झाले असा सवाल त्यांनी केला. काय जादू झाली माहिती नाही. आम्ही या विमानांच्या जुळणीचे काम हिंदुस्तान एरोनाटिक्स कंपनीला दिले होते. ही सरकारी मालकीची विमान कंपनी असून या विमान कंपनीला विमाने तयार करण्याचा 70 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्याकडील हे काम काढून घेऊन ते विमाने तयार करण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले.
अनिल अंबानी यांची ही कंपनी राफेलचा फेरकरार होण्याच्या केवळ दहा दिवस आधी स्थापन झालेली कंपनी आहे असेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.