गणेशोत्सवात दक्षिण मुंबईत मुंबईबाहेरून येणारे पर्यटक यांचा प्रवास सुलभ ; बेस्टने आणलीये ‘ही’ खास सुविधा
![During Ganeshotsav, the travel of tourists coming from outside Mumbai is easy in South Mumbai; Best has brought 'this' special facility](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/During-Ganeshotsav-the-travel-of-tourists-coming-from-outside-Mumbai-is-easy-in-South-Mumbai-Best-has-brought-this-special-facility.jpg)
मुंबईःगणेशोत्सव कालावधीत भाविकांना मुंबईतील गणपती मूर्तींचे सुलभ दर्शन घेता यावे, मुंबईभर फिरता यावे यासाठी बेस्टने गणेशोत्सव कालावधीत रात्री विशेष बससेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान २५ विशेष बस रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत मुंबईत धावणार आहेत. यामुळे मुंबईकर आणि मुंबईबाहेरून येणारे पर्यटक यांचा प्रवास सुलभ होणार आहे.
करोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षानंतर प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने मुंबईत भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. मुंबईतील रोषणाई, सजावट आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडतात. वाहतुकीचे साधन नसल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने रात्रीच्या वेळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर धावणार जादा बस
१ मर्यादित – इलेक्ट्रिक हाउस ते कुलाबा आगार – बीकेसी, ४ मर्यादित – आोशिवरा आगार ते जे.जे. रुग्णालय, ७ मर्यादित- विक्रोळी आगार ते जे.जे. रुग्णालय, ८ मर्यादित- शिवाजी नगर ते जे.जे. रुग्णालय, ६६ मर्यादित- राणी लक्ष्मीबाई चौक-कुलाबा आगार, २०२ मर्यादित – माहीम बसस्थानक- बोरिवली स्थानक(पश्चिम), सी ३०२ – राणी लक्ष्मीबाई चौक -महाराणा प्रताप चौक (मुलुंड), सी ३०५ – बॅकबे आगार- धारावी आगार, सी ४४०- माहीम बसस्थानक- बोरीवली स्थानक पूर्व
डबलडेकर हेरिटेज बसमधून भ्रमंती
गणेशोत्सवात दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांना विशेषता फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा येथे रात्रीच्या वेळी गणपतीच्या दर्शनासाठी येणारे प्रवासी,भाविकांच्या सोयीसाठी खास डबलडेकर हेरिटेज टूर बससेवा चालविण्यात येणार आहे. या बस रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत धावणार आहेत. या बसमार्गाची सुरुवात म्युझियम येथून होऊन पुढे गेट वे आफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट, महर्षी कर्वे रोड, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जिजामाता उद्यान, लालबाग असा प्रवास करणार आहे. परतीच्या प्रवासातही हाच मार्ग आहे.