२ डबल डेकर बसचा भीषण अपघात; ८ प्रवाशांचा जीगाच मृत्यू, ३५ जखमी
![2 double decker bus fatal accident; 8 passengers died instantly, 35 injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/2-double-decker-bus-fatal-accident-8-passengers-died-instantly-35-injured.png)
बाराबंकी : रस्ते अपघातामध्ये वारंवार वाढ होत असताना आता आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर सोमवारी पहाटे हा भीषण अपघात झाला. एका उभ्या असलेल्या बसला भरधाव वेगाने येणाऱ्या डबलडेकर बसने धडक दिली. या अपघातात ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ३५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हैदरगड सीएचसी इथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला आहे. बाराबंकी येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री योगी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करतानाच, शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे.
अपघाताविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. त्यानंतर पूर्वांचल द्रुतगती मार्गावर लोणीकत्रा पोलीस स्टेशन हद्दीतील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ दुसऱ्या बसने आधीच उभ्या असलेल्या डबलडेकर बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये तब्बल ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.