भातसा धरणाचे ५ दरवाजे आज उघडणार
![5 gates of Bhatsa Dam will be opened today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/5-gates-of-Bhatsa-Dam-will-be-opened-today.jpg)
टिटवाळा : भातसा धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणातील साठा वाढला आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता धरणाचे पाच वक्रद्वार उघडून सुमारे ६२१५.४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनकडून देण्यात आली आहे. धरणाचे दरवाजे उघडणार आणि पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने भातसा नदी किनाऱ्यावरील विशेषतः शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदी काठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा, मिडल वैतरणा, मोडक सागर या चार ही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळेच भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.भातसा धरणात मंगळवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत १३८.१० मीटर एवढी पाणी पातळी होती.
दरम्यान आज म्हणजे बुधवारी सकाळी ११ वाजता धरणाची १ ते ५ क्रमांकाची वक्रद्वारे उघडण्यात येणार आहेत. यातून धरणातील ६२१५.४४ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे या काळात नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व इतर गावांमध्ये प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना केली आहे.