कोल्हापूरात पावसाचा जोर कायम; पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
आजूबाजूच्या गावात पाणी शिरल्याने पुराचा धोका
कोल्हापूर: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ८ जुलैपर्यंत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा देखील हाय अलर्ट वर गेली आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी आपल्या पात्राबाहेर पडली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळी सहा वाजता ३० फुटांवर गेली असून कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट येथे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडत असून अजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले आहे. सद्यस्थितीत ३० फुटांवर पाणी पातळी पोहोचली असून ३९ फूट इतकी इशारा पातळी आहे. इशारा पातळी गाठण्यासाठी केवळ ९ फूट पाणी पातळी कमी असल्याने यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून इशारा मिळताच नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
पंचगंगा नदीचे पाणी आजूबाजूच्या गावात शिरल्याने नदीकाठी घरं असलेल्या नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच एनडीआरएफच्या दोन तुकड्या देखील कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. त्यांनी आज सकाळी शिवाजी पूल परिसराची पाहणी केली आहे. एनडीआरफच्या दोन तुकड्यांपैकी एक तुकडी कोल्हापूर शहरात तर दुसरी तुकडी शिरोळ तालुक्यात काम करेल. प्रत्येक तुकडीत २५ जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बृजेश कुमार रैकवार आणि शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील टीम काम करेल. तर निरीक्षक लोकेश रत्नपारखी व प्रशांत चिता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ येथील टीम काम करणार आहे.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफचे जवान व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदत कार्य चांगल्याप्रकारे करेल, त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरु नये, असे आवाहन यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार यांनी केले.