येरवडा मनोरुग्णालयात मिळणार पोलीस सुरक्षा
पुणे, – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैद्यांनी तेथील परिचारकांवर हल्ला करत काही दिवसांपूर्वी पळ काढला. त्यामुळेच आता मनोरुग्णालयात पोलीस सुरक्षा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे कैदी मनोरुग्णांबरोबर लवकरच पोलीस बंदोबस्तही देण्यात येणार आहे.
येरवडा कारागृहातील काही कैदी हे मनोरुग्ण असल्याने येरवड्याच्या मनोरुग्णालयात दाखल केले जातात. यातील काही रुग्णांवर खुनाचा गुन्हा दाखल असतो. हे रुग्ण अनेकदा हाताबाहेर जात मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरच हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल असणाऱ्या मनोरुग्णांनी दोन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळेच मनोरुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आंदोलन करत कैदी मनोरुग्णांबरोबरच पोलीस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. पुणे वगळता अन्य सर्व ठिकाणी अशा प्रकारे कैदी मनोरुग्णांबरोबर पोलीस सुरक्षा दिली जाते मग येथेच का नाही? असा प्रश्नही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक व मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी शासनाला पत्र पाठविले होते. त्यानुसार आता लवकरच पोलीस सुरक्षा देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी दिली.
येरवडा मनोरुग्णालयात पोलीस प्रधान सचिव कार्यालयाकडून पुणे पोलिसांना पत्रव्यवहार झाला आहे. त्यानुसार पोलीस सुरक्षा देण्यासाठी पुणे पोलिसांकडून पाहणीदेखील करण्यात आली आहे. लवकरच ही सुरक्षा देण्यात येईल.
– डॉ. अभिजीत फडणीस, वैद्यकीय अधीक्षक, येरवडा मनोरुग्णालय.